शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११

काळाची किमया


माणसाचे जीवन हे गहन आहे.एक विचार केला तर अतर्क्य आहे आणि दुसरा विचार केला तर घडी दो घडीचा डाव आहे असे वाटते.काही विचारवंतांनी याला ईश्वराजवळ जाण्याची साधना म्हटले तर काहींना हे द्यूताच्या खेळाप्रमाणे भासले.आता हेच पहा ना! आपण कधी कुणावर हक्क गाजवतो,आणि कधी गुलाम म्हणून जगतो, कधी मोठा पराक्रम करून छाती फुगवतो तर कधी भित्र्या श्वापदांप्रमाणे गुहेत लपतो. आपण स्वतःला दुसर्यापेक्षा हुशार समजणारे एखाद्या सव्वाशेराला पाहून लगेच न्यूनगंड उत्पन्न करून घेतो,आपल्या मनात कधी मंद मंद समीर वाहत असतो तर कधी सगळ्यांच्या नकळत प्रलयकाळाचे वादळ माजलेले असते. आपण कधी कधी कुणावर हसतो,चिडतो.रडतो,पडतो,उठतो,घडतो..........
तरी आपल्या जीवनात आपण काही लक्षात घेत नसल्यासारखे पुढेच धावत राहतो...कुणी रागावला तरी तो कधी न कधी खुश होण्याची शक्यता संपलेली नसते..कुणी विस्कटला तरी तो ठिकाणावर येणारच असतो.पानगळ झाली तरी झाली ,वसंत येणारच आहे.आज चुका झाल्या,म्हणून उद्याही थोडेच मी चुकणार आहे ! आणि जरी चुकलो तरी मला दुरुस्त करणारा कुणीतरी आहे. होत्याचं नव्हतं आणि नव्ह्त्याच होत करणारे कुणीतरी असल्याशिवाय आपण एवढे राजरोस व स्वैरपणे भागदौड करू शकत नाहीत.रात्रंदिवस काहून मेहनत करणाऱ्याला माहित असते कि मी जरी आजारी पडलो तरी डॉक्टर आहेतच कि !
तसंच जीवनातील जखमा भरून काढणाराही एक डॉक्टर आहे ...तो म्हणजे आपला time.तो एकदा आला कि मग, काही पण होऊ शकते...आटलेल्या नदीलाही पाणी वाहते,आणि अस्ताला गेलेला सूर्यही उगवतीला येतो.हा टाईम म्हणजे काळ. काळाची करणी तो कधी विसरलाय का?जीवनातील खाचखळगे बुजवून एका level मध्ये आणणारा आणि नेहमी भविष्याची वाट दाखविणारा काळ जीवनभर प्रत्येकाची साथ सोडत नाही..कुणीतरी काळाला धन्वंतरीच म्हटले आहे.समाजातील वेदनांची तीर्वता कमी करत तो आपले काम करतच आहे.खरच काळासारखा धन्वंतरी दुसरा कोणी नाही. दुभंगलेले हृदय कसे जोडावे आणि वठलेले झाड कसे पालवावे, हे त्यालाच कळत असते.
------अरुण झिंजुर्डे----