Written by Dr Rushikesh Kavchat
बसस्टॅंडवर खूप गर्दी होती. मी तब्बल एक तास बसची वाट पाहत बसलो होतो.
तेवढ्यात बस आली आणि मी बॅग अडकवून बसच्या दरवाजाकडे धावलो. गर्दी खूप
असल्याने धक्के खात मी कसेबसे स्वतःला आत ढकलले. गाडी खचाखच भरलेली होती.
दोन सीटच्या मधल्या जागेतही माणसे गर्दी करून उभी राहिली होती. त्यामध्ये
प्रामुख्याने स्त्रिया, वृद्ध आणि लहान मुलेसुद्धा होती.
एका रिकाम्या जागेवर ७०-८० वर्षे वयाचे आजोबा बसण्यासाठी धडपड करू लागले;
परंतु दोन कॉलेज युवकांपुढे त्यांची डाळ शिजली नाही. त्या दोघांनी ती सीट
ढापली. आजोबा मात्र "डिसमुड' होऊन तसेच ताटकळत उभे राहिले. त्यांच्या
मागच्या सीटवर एक नवविवाहित जोडपे बसले होते व त्या जोडप्याच्या बाजूच्या
सीटवर मी होतो. अशा प्रकारे ती ओव्हरलोड झालेली बस एकदाची निघाली.
चार-पाच वाजता गाडी हलली. बसमधील वातावरण पाहून मी विचारात पडलो. ते दोन
कॉलेज तरुण गाडगेबाबांच्या चरित्राविषयी आलेल्या प्रश्नाची चर्चा करत
बसले होते. प्रत्यक्षात मात्र म्हाताऱ्याला धक्का देऊन स्वतः सीटवर जागा
गाठली. औपचारिक शिक्षण आणि व्यवहारातील वागणूक यामधील दरी स्पष्ट जाणवत
होती.
उभे राहून दमून गेलेले आजोबा मागच्या जोडप्याकडे पाहून स्वतःच लाजत होते;
पण ते जोडपे सर्व लाज सोडून नको ते चाळे करण्यात मग्न होते. कदाचित त्या
आजोबांना आपला भूतकाळ आठवून आजच्या निलाजऱ्या तरुणाईची चीड येत असावी.
समोर काही स्त्रिया उभ्या होत्या. त्यांच्या वेशभूषेवरून त्या खेड्यातील
असाव्यात, असे वाटत होते. त्यांच्या बाजूलाच दोन खिडक्यांवर महिलांसाठी
राखीव असे लिहिलेले होते; पण तेथे मात्र पुरुषच बसलेले होते. त्या
स्त्रियांना वाचता येत नसावे; मग त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव कशी
होणार? आणि झाली तरी त्यासाठी कोण भांडणार?
बस पुढे धावत होती. सूर्य जगाचा निरोप घेताना खिडकीतून दिसत होता. बाहेर
संध्याकाळच्या पूर्वीची गुलाबी रोषणाई दिसत होती. समोर सूर्यनारायणाची
मोठीच्या मोठी आकृती आपल्या अवतीभोवती लाल गुलाल उधळत असल्याचा मला भास
झाला. मी त्या लालबुंद गोलाकडे एकटक पाहत बसलो. का बरे सूर्य एवढा
लालेलाल दिसत असावा? दिवसभर या कार्यमग्न जगाला प्रकाश देताना या जगातील
लोकांचा उघड उघड चाललेला धर्माचा बाजार, मानवतेचाच नाश करू पाहणारा मानव,
जाती-धर्मावरून होणाऱ्या दंगली, जाळपोळ, देशा-देशांतील पिढ्यान् पिढ्या
चालत आलेले परस्पर वैमनस्य, धरणीमातेचा विध्वंस करणाऱ्या
शस्त्रास्त्रांची चाललेली तीव्र स्पर्धा हे सर्व पाहून सूर्याला आपल्या
या लेकरांचा राग आला असावा आणि तो "मी आता उद्या येणार नाही,' असे म्हणून
चालला असावा. त्याच्या त्या अनावर झालेल्या रागामुळेच तो एवढा लालेलाल
झाला असावा, असे मला वाटले. तेवढ्यात अचानक बसमध्ये गोंधळ उडाला. त्या
गोंधळाने मी भानावर आलो. कोण्या एका व्यक्तीची पर्स चोरीला गेली होती.
"पर्समध्ये चार हजार रुपये होते', असे तो "हजार' या शब्दावर जोर देऊन
मोठमोठ्याने ओरडत होता. थोडा वेळ ओरडून घसा कोरडा झाल्यानंतर तो शांत
झाला.
आता बसमध्ये अंधार वाढू लागला होता. सूर्यनारायण रुसून गडीगुप झाले होते.
बस प्रत्येक स्टॉपवर थांबायची. दोन-तीन डोकी उतरताना आणि पाच-सहा चढताना
दिसायची. त्यामुळे बसमधील गर्दी वाढतच होती. ढेरीवाला कंडक्टर मोठ्या
मुश्किलीने तिकीट काढत होता. बसची ती अवस्था पाहून मला आपला देशही असाच
लोकसंख्येच्या भयानक सापाच्या विळख्यात सापडल्यासारखा दिसत होता.
बस जशी पुढे धावत होती तसा काळोखही वाढत होता. बस जणू प्रकाशाकडून
अंधारात जात होती. "तमसो मा ज्योतिर्गमय' या उक्तीच्या विपरीत अंधुकशा
प्रकाशामध्ये गर्दीमधून मला चालकाचे दर्शन होत होते, तर कधी तो नजरेआड
होत होता. अर्धे टक्कल पडलेले. डोळ्यावर चौकोनी फ्रेमचा चष्मा,
त्याच्याकडे पाहताना माझ्या कल्पनेची गाडी वेगाने धावू लागली. बसपेक्षा
कितीतरी वेगाने माझ्या कल्पनाशक्तीच्या जादूने त्या चालकाचे अर्धे टक्कल
आता पूर्ण गोटा झाले. त्याचा चौकोनी चष्मा हळूहळू आपला आकार बदलून अचानक
गोलाकार दिसू लागला. तेवढ्यात गर्दीमुळे तो आता दृष्टिआड झाला. पुन्हा
क्षणात तो जेव्हा दृष्टिक्षेपात आला अन् मी त्याच्याकडे डोळे विस्फारून
एकटक पाहतच राहिलो... आश्चर्यम्! बापू... बसचे चालक? क्षणभर वाटले,
मुन्नाभाईसारखा माझ्या भेजात काहीतरी केमिकल लोचा झाला की काय?
होय, बापूच होते ते! आपल्या देशाचे चालक. दीनदुबळ्यांवर होणारा अत्याचार,
संस्कृतीचे धिंडवडे काढून मुक्त स्वैराचार करणारी बेधुंद तरुणाई, चोऱ्या,
दरोडे, निरक्षरता, अज्ञान आणि मारुतीच्या शेपटाप्रमाणे वरचेवर वाढणारा
लोकसंख्येचा आलेख... या सगळ्या गोष्टींचा प्रत्यय बसमध्ये येत होता. भयाण
अंधारातून बस चालत होती. चालकाच्या समोर मात्र दोन स्वयंप्रकाशित तेजस्वी
दिवे होते.... सत्य आणि अहिंसा. अधर्माच्या दाट काळोखाचे पोट फाडत बस
पुढे धावत होती, असे वाटले. चालक म्हणजे बापू नव्हते आणि ही बस म्हणजे
देश नव्हे, याची मला जाणीव झाली. बसमधील अंधकार आता त्या पर्स चोरणाऱ्या
चोराला आणि त्या जोडप्याला अनुकूल साथ देत होता. महिलांच्या सीटवर बसणारे
पुरुष मोठ्याने घोरत होते, तर त्या महिला खाली दोन पायांवर बसल्या
होत्या. ते वृद्ध आजोबा तसेच ताटकळत उभे होते. बस पुढे धावत होती.
भविष्याच्या काचेवर वर्तमानातील पापांची धूळ साचत होती. समोरचे चित्र
अस्पष्ट दिसत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा